पुणे | खराडी
खराडीमध्ये वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने त्यावर तात्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्त्यालगतची दुकाने, मार्केट, बेशिस्त पार्किंग आणि त्यातच नव्याने उभारले जाणारे अतिक्रमणाचे स्टॉल यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
रस्त्याची उपलब्ध जागा आधीच कमी असताना त्यावर वाहने उभी केली जातात आणि त्यातच स्टॉल व बाजार भरवले जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
रस्त्यावर बाजार भरवण्याला प्रोत्साहन का?
खराडीमध्ये लोकप्रतिनिधींच्या बॅनरखाली भरवले जाणारे आठवडी बाजार हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
PMCच्या राखीव भूखंडावर आठवडी बाजार भरवण्यासाठी नियमानुसार आवश्यक परवानगी असणे गरजेचे आहे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींच्या बॅनरखाली बाजार भरवले जात असतील, तर त्या बाजारासाठी आवश्यक परवानग्या आहेत का, तसेच त्यांच्या नावाचा वापर नेमका कशासाठी होत आहे, याचीही जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
“रस्त्यावर बाजार, स्टॉल किंवा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन मिळता कामा नये.”
आजच्या कारवाईनंतर पुढचा प्रश्न कायमस्वरूपी उपायांचा
दरम्यान, स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभागाने परिस्थितीची दखल घेत घटनास्थळी कारवाई करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
मात्र केवळ एका दिवसाची कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. आज अतिक्रमण हटवले आणि काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी स्टॉल उभे राहिले, तर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे PMCच्या बांधकाम विभागाने आणि अतिक्रमण विभागाने या प्रकाराची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच भविष्यात त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“नागरिकांचा रस्ता नागरिकांसाठीच!”
खराडीतील वाढती वाहतूक कोंडी केवळ वाहनचालकांसाठीच नाही, तर पादचारी आणि स्थानिक रहिवाशांसाठीही त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे रस्त्याचा वापर बाजार, स्टॉल किंवा अनधिकृत पार्किंगसाठी न होता सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठीच झाला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली.
“नागरिकांचा रस्ता नागरिकांसाठीच राहिला पाहिजे. वाहतूक सुरळीत आणि अतिक्रमणमुक्त खराडी हीच आमची मागणी,” अशी स्पष्ट भूमिका सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे यांनी मांडली.
आता पोलीस आणि वाहतूक विभागाच्या प्राथमिक कारवाईनंतर PMCकडून अतिक्रमणाविरोधात कायमस्वरूपी काय पावले उचलली जातात, याकडे खराडीकरांचे लक्ष लागले आहे.

